आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहर आणि परिसरातील काही भागात आज गुरुवार (दि. 5 मार्च) रोजी सकाळी सुमारे १० वाजून ८ मिनिटांच्या सुमारास प्रचंड मोठा गूढ आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या या मोठ्या आवाजामुळे अनेक नागरिक घराबाहेर येऊन काय घडले याची चौकशी करू लागले.
शहरातील विविध भागांतील नागरिकांनी हा आवाज ऐकू आल्याचे सांगितले असून, हा आवाज नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे गूढ आवाज मागील काही दिवसांत वारंवार ऐकू येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण होत आहे.
संबंधित यंत्रणांनी या आवाजाचे कारण शोधून नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.









