प्रतिनिधी / धाराशिव
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा धाराशिव शहरात घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेचे आयोजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील आणि धाराशिव जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाकडून केले जाणार आहे.विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिल्ह्याचे विभाजन होण्यापूर्वी म्हणजे 1969 मध्ये लातूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर जिल्ह्याला मान मिळाला आहे.
महाराष्ट्र आणि सबंध देशाचं आकर्षण असलेली लक्ष असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अंदाजे नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार असून, या स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. संयोजन समितीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये घेण्याची मागणी करण्यात येत होती.त्यानुसार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धाराशिवला भेट देऊन स्पर्धेसाठी मैदानाची पाहणी केली तसेच शहरात खेळाडूंची निवास व्यवस्था होऊ शकते का, याचीही माहिती घेतली.पदाधिकऱ्यांनी कुस्ती प्रेमींसोबत तसेच अन्य क्रीडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. माहिती घेतल्यानंतर आणि गेल्यावर्षी यशस्वीपणे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेवरून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत मागणीनुसार धाराशिव शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर केले.
यासंदर्भात माहिती देताना अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद भक्त, तांत्रिक सचिव बंकट यादव,विजय भराटे म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात ही स्पर्धा आयोजित करावी अशी वारंवार मागणी होत होती,त्यानुसार आज आम्ही भेट देऊन पाहणी केली. एकंदर उत्तम वातावरण आणि आयोजक मंडळींचा उत्साह, यावरून ही कुस्ती स्पर्धा उत्तम आणि यशस्वीपणे पार पडेल,असा विश्वास आहे.यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील,खोखो असोसिएशनचे डॉ.चंद्रजित जाधव,धाराशिव जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तारीख जाहीर होणार
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर होणार असून,स्पर्धेसाठी 20 गट सहभागी होतील. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील कुस्तीपटू,कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धा होईल.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सभेत लवकरच स्पर्धेची तारीख जाहीर केली जाईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले तर स्पर्धेमुळे स्थानिक कुस्तीपटूना संधी मिळेल,तसेच या खेळाचा प्रचार-प्रसार होईल, असे डॉ.चंद्रजित जाधव म्हणाले. ही स्पर्धा धाराशिवमध्ये घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल परिषदेचे आभार मानून सुधीर पाटील यांनी स्पर्धा अत्यंत दिमाखदारपणे पार पाडू असे परिषदेला आश्वस्त केले.तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.