आरंभ मराठी / आलुर
उमरगा तालुक्यातील आलूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मुरूम पोलीस स्टेशनचे पीएसआय संदीप दहिफळे यांनी एका पत्रकाराशी गैरवर्तन करत शिवीगाळ केल्याची घटना घडली असून या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त होत आहे. मतदान प्रतिनिधींची मनमानी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीसाठी पत्रकार मतदान केंद्रावर उपस्थित राहिले होते. पाहणीदरम्यान मतदान केंद्रावर पाणी पिणे तसेच स्वतःचे मतदान करण्याचा त्यांचा उद्देश होता.
यावेळी पीएसआय संदीप दहिफळे व पोलीस पथक मतदान केंद्रावर दाखल झाले. मोबाईल वापरास बंदी असल्याची सूचना देत सर्व नागरिकांना मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगण्यात आले. पत्रकारांनी स्वतःचा मोबाईल बाहेर ठेवून मतदान कक्षाकडे जात असताना पीएसआय दहिफळे यांनी अचानक शिवीगाळ सुरू केली. पत्रकारांनी ओळखपत्र दाखवून आपण पत्रकार असून पाहणीसाठी आलो असल्याचे स्पष्ट केले तरीही गैरवर्तन थांबले नाही.
पत्रकारांनी मतदान केंद्राच्या शंभर मीटर नियमाची अंमलबजावणी मान्य करून बाहेर थांबण्याची तयारी दर्शवली व त्याआधी मतदान करण्याची विनंती केली. मात्र पीएसआय दहिफळे यांनी मतदान करू न देता त्यांना मतदान केंद्रावरून हाकलून लावले. या प्रकारामुळे संबंधित पत्रकाराला मतदानाचा मूलभूत हक्क बजावता आला नाही. या घटनेमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या या वर्तनाचा तीव्र निषेध केला जात आहे.











