आरंभ मराठी / कळंब
कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथे सुरू असलेल्या “इव्हीएम हटाव” आंदोलनादरम्यान शासकीय कामात अडथळा आणत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास तांदुळवाडी येथे बाळराजे रामराव आवारे पाटील हे इव्हीएम हटावच्या मागणीसाठी उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे डॉ. सुमित मुंढे यांनी लेखी स्वरूपात कळवले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपोषणकर्त्यांना उपचारासाठी ॲम्बुलन्सद्वारे दवाखान्यात घेऊन जात असताना उपोषणकर्त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून ॲम्बुलन्स व सरकारी वाहनासमोर झोपून रस्ता अडवला. तसेच उपोषणकर्त्यांना उपचारासाठी नेण्यास मज्जाव करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
यावेळी जमावाने पोलीस अधिकारी व अमंलदारांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, ज्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची गरज निर्माण झाली.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस निरीक्षक प्रभा दासराव पुंडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात आरोपी नामे आण्णासाहेब जाधव, पुष्पक देशमुख, संदीप चाळक, विशाल कुटे, लमण पाटील, राजेश्री पाटील, हिमानी मोहोड व इतर दहा इसम अशा एकूण १८ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(1), 189(2), 190, 191, 352 व 221 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.








