चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
धाराशिव ; बाप्पा, आम्हाला माफ कर. आम्ही हताश आहोत, हतबल आहोत, उद्विग्न अन् खिन्न आहोत. कारण, आम्ही असमर्थ ठरलोय! यावर्षीही तुझ्या वाटेवरील खड्डे, कचऱ्याच्या पायघड्या बाजूला सारून मऊ, मुलायम रस्ता देऊ शकलो नाहीत. तू समजून घे बाप्पा. जमलंच तर विकासाच्या मारेकऱ्यांना सद्बुद्धी दे, तब्बल 18 महिन्यापासून शहरातील 140 कोटींच्या विकासकामांना अन् 4 महिन्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या कामांना लागलेला ब्रेक सैल करण्यासाठी त्यांना मती दे..! बाप्पा तू बुद्धीची देवता आहेस म्हणून तुझ्याकडं हे मागणं आहे.
आम्हा भक्तांना दरवर्षी विकासाची स्वप्न पडतात पण अशी स्वप्नं पुन्हा गायब होतात किंबहुना त्यांचा विसर पडावा अशी आमची मानसिकता बनलीय, याला काय म्हणावं कळत नाही. अशा स्वप्नांना एक दिवस वास्तवाची जाण होऊ दे अन् राज्यकर्त्यांना त्याचं भान येऊ दे एवढीच तुझ्याकडून अपेक्षा.
दरवर्षीप्रमाणे यंदाही “गणरायाचे आगमन” या शब्दांनी शहरात भक्तिभावाचा जल्लोष आहे. पण या आनंदसोहळ्याच्या छायेत वास्तव लपलं आहे. धाराशिव शहरातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून वाटतं की, आता फक्त आम्हालाच नव्हे तर गणपती बाप्पा तुलाही खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे.
शहरात १४० कोटी रुपयांची कामे १८ महिन्यांपूर्वी मंजूर झाली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, कुरघोड्या आणि ठेकेदार-प्रशासनातील गोंधळामुळे या कामांची केवळ चर्चा झाली, प्रत्यक्षात रस्ते मात्र तशाच खड्ड्यांनी भरलेले आहेत..त्यामुळे आमच्यासोबत तुझीही या विवंचनेतून सुटका नाही.
मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ल्या एवढंच नाही तर तुझ्यासाठी बनवलेल्या स्टेजकडे जाणाऱ्या वाटा, सगळीकडे दगड, चिखल, खड्डेच खड्डे! पावसाळ्यामुळे ही परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.
धाराशिव ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या शहराची ही अवस्था पाहून नागरिकांचं मनोमन दु:ख वाढलं आहे. जनता सोशिकपणे सहन करतेय, तक्रारी करतेय, आंदोलनेही झालीत…तरीही कामे सुरू होत नाहीत. नेत्यांच्या कुरघोड्यांत, प्रशासनाच्या दुर्लक्षात आणि ठेकेदारांच्या मनमानीत शहराचे प्रश्न खोल खड्ड्यात गेले आहेत.
गणरायाचे आगमन म्हणजे उत्साह, आनंद आणि श्रद्धेचा उत्सव. पण यावर्षी धाराशिवकरांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय बाप्पा, आम्हाला माफ कर… आमच्यासारखाच तुलाही या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकांनी वेळेत जागे होऊन कामे केली नाही, तर पुढच्या वर्षीही हीच अवस्था असेल. मात्र भक्तांची एकच प्रार्थना बाप्पा, त्यांना सद्बुद्धी दे. कारण तुझ्या उत्सवातली ही वेदना आम्हाला सहन होत नाही.