आरंभ मराठी / धाराशिव
मागील काही दिवसांपासून या ना त्या कारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा रद्द होत होता. परंतु आता त्यांचा धाराशिव दौरा निश्चित झाला असून, येत्या शनिवारी म्हणजे १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत.
राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले असून याच अभियानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी परंडा शहरात येणार आहेत. यापूर्वी हा कार्यक्रम उमरगा शहरात घेण्याचे ठरवले होते. परंतु कार्यक्रमाचे ठिकाण बदलून हा कार्यक्रम पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने १५ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वितरित केले होते. याच योजनेच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा निश्चित करण्यात आला होता. तो दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाकडून जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. परंडा शहरात देखील कार्यक्रमस्थळी तयार सुरू करण्यात आली आहे.