शहराला खड्ड्यात घालणारे, बोगस कामातून मलिदा खाणारे कोण..?,
2016 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय..?
आरंभ मराठी / धाराशिव
2016 नंतर म्हणजे तब्बल 9 वर्षांनी धाराशिव नगर पालिकेची निवडणूक होत आहे. 2016 च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असो वा शिवसेना-भाजप युती, दोन्हीकडून शहरातील मतदारांवर विकासाच्या गाजरांचा वर्षाव करण्यात आला होता. शहराला 24 तास पाणी, गुळगुळीत रस्ते, सुसज्ज भाजी मंडई, आधुनिक उद्याने, भुयारी गटार योजना, कचरा मुक्त शहर, तसेच पथदिव्यांचा लखलखाट, अशी अनेक आश्वासने देऊन मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न झाला.यापैकी शहराला काय मिळाले.. टोलवाटोलवी..?. कामे न करता कोट्यवधी रुपये लाटले कुणी..?, शहराला 25 वर्षे मागे नेले कुणी..?,आता मतदारांच्या दरबारात प्रामाणिकपणे उत्तरे द्या. जनता तुमची वाट पाहत आहे.

धाराशिवच्या एकंदर अवस्थेवर बोलण्याची स्थिती राहिली नाही. शरम वाटावी, अशी शहराची दशा करून ठेवण्यात आली आहे. कुणी खड्डे खोदले तर कुणी खड्ड्यात पैसे खाल्ले. खड्ड्यांचे राजकारण अखेरपर्यंत संपले नाही. आता निवडणुका लागल्या आहेत. पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात बहुतांश तेच चेहरे आहेत. बदल फक्त पक्ष, आघाड्या आणि युतीमध्ये दिसत आहे. 2016 पासून निवडणुकीनंतरच्या नऊ वर्षांत सत्तेच्या फेरबदलात शहर विकासात मात्र मागेच राहिले. सत्तेचा स्वाद जवळपास सर्व प्रमुख पक्षांना मिळाला, तरीही एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला नाही.

सत्ताधारी बदलले,प्रशासन आले, पुन्हा प्रशासनावर सत्तेचा प्रभाव राहिला पण रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. धरणं ओसंडून वाहत असतानाही शहराला 24 तास पाणीपुरवठा कागदावरच सुरू आहे. जिजामाता,छत्रपती संभाजी महाराज उद्यानांची बकाल स्थिती कायम आहे.किंबहुना या उद्यानांचे विद्रुपीकरण अधिक प्रमाणात झाले आहे. बंद पथदिवे, कचऱ्याचे ढीग, धुळीचे लोट सगळं कायम आहे. जणू धाराशिव 25 वर्षांपूर्वी होते त्यापेक्षा भयावह स्थितीत. परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या नागरिकांनी कधी सामाजिक विषय बनवला नाही.त्यामुळे कधी मोर्चा निघाला नाही.तेवढी सहनशीलता जनतेकडे आहे. पण आता जनतेच्या संयमाची खरी परीक्षा आहे.

संयमाची थट्टा..
धाराशिव शहरात भुयारी गटार योजनेची चर्चा 14 वर्षापासून सुरू आहे. 2012 च्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधकांनी भुयारी गटार योजनेचा मुद्दा जाहीरनाम्यात घेतला होता. व्यवस्थित न राबवल्याने हीच योजना नागरिकांच्या मुळावर उठली. योजनेमुळे शहर खड्ड्यांनी व्यापले.पाणी समस्या कायम आहे,दुर्गंधी आणि कचरा मुक्त शहराचे दिवास्वप्न कायम आहे.
किंबहुना आजही नागरिकांच्या संयमाची थट्टाच सुरू आहे.
दिलेल्या आश्वासनांचे स्मरण ठेवा..
रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा मुबलक पुरवठा, भाजी मंडईचा विकास, भुयार गटार योजनेची पूर्तता आणि मूलभूत सुविधा, या प्रत्येक विषयावर सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे. कारण धाराशिवकरांनी नऊ वर्षे केवळ शब्दांचे, आश्वासनांचे शासन आणि प्रशासन पाहिले आहे. आता उमेदवारांना मतदारांपुढे उभे राहण्याची वेळ आली आहे. तेव्हा 9 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे स्मरण ठेवा.









