आरंभ मराठी / धाराशिव
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमान्वये पात्र लाभार्थ्यांना शासनाचे लाभ देणे आवश्यक असल्याने धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी व पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांची (यू.डी.आय.डी.) दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व पडताळणी करण्यासाठी दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद धाराशिव येथील यशवंत सभागृहात विशेष तपासणी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती स्थापन करण्यात आली आहे.
सदर पडताळणीदरम्यान लक्षणीय म्हणजेच ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या कर्मचाऱ्यांनाच शासनाचे लाभ अनुज्ञेय राहणार आहेत. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र चुकीचे, बनावट आढळल्यास किंवा दिव्यांगत्व ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास संबंधित कर्मचाऱ्यास कोणताही लाभ अनुज्ञेय राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासाठी तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना मूळ कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्याअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची नावे, शाळा, नियुक्तीचा संवर्ग, दिव्यांगत्वाचा प्रकार, यू.डी.आय.डी. क्रमांक यांची सविस्तर माहिती कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये दिनांक ०७ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
ही माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद धाराशिव नागेश मापारी यांनी दिली असून, संबंधित सर्व विभागांनी याची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








