शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांचा जोरदार टोला
आरंभ मराठी / धाराशिव
विरोधकांना खोटं-नाट म्हणण्यापूर्वी स्वतः आरशात बघा; मग कळेल खरं आणि खोटं कोण, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टोकाची टीका केली. बिहारच्या राजकीय घडामोडींचा हवाला देत धाराशिवची तुलना करणं हे धाराशिवकरांचा अपमान असल्याचा आरोप जाधवर यांनी केला.
जाधवर म्हणाले, शहर विकासाबद्दल बोंबा मारताना तुम्ही केलेली अडवणूक जनता विसरणं शक्य नाही. 140 कोटींच्या रस्ते कामांवरून भाजपने झारीतील शुक्राचार्य म्हणून पालकमंत्र्यांकडे बोट दाखवलं. स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन करून खोटेपणा कसा करता येतो हेही तुम्हीच दाखवलं.
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती आणण्यासाठी राणा पाटील यांनी घेतलेली मेहनत अजूनही जनतेच्या लक्षात असल्याचे सांगून जाधवर म्हणाले की विरोधातील आमदार असल्याचा राग तुम्ही थेट जनतेवर काढला आणि आज पुन्हा त्याच जनतेच्या मतांसाठी विकासाची नाटकी भाषा करता. हेच तुमच्या खरेपणाचं आणखी एक दर्शन.
बिहार निवडणुकीच्या निकालावरून राणा पाटील ‘हुरळून गेले’ असून धाराशिवमध्ये राहतोय हेच विसरल्यासारखे वागत आहेत. बिहारची धाराशिवशी तुलना करून तुम्ही धाराशिवकरांचा अपमान केला आहे. या विधानाचे उत्तर जनता तुम्हाला २ डिसेंबरच्या मतदानात देईल, असा इशारा जाधवर यांनी दिला.








