महाविकास आघाडी, महायुती व राष्ट्रवादीत उमेदवार जाहीर, तणाव तीव्र
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आघाड्यांत उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सुरू असताना, तिन्ही प्रमुख गटांतील संभाव्य उमेदवारांची नावे विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहेत.
महाविकास आघाडीतून शिवसेना (उबाठा गट) यांच्या संगीता सोमनाथ गुरव यांचे नाव पुढे आले असून, महायुतीमध्ये भाजपकडून नेहा राहुल काकडे यांना हिरवा कंदील मिळाल्याची विश्वनीय सूत्रांची माहिती आहे. शिवाय, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मंजुषा विशाल साखरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे, महायुती व महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही आघाड्यांत जोरदार ओढाताण सुरूच आहे. महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव वाढला असून, शिवसेनेने अनेक प्रभागांत एबी फॉर्मचे वितरण केल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. पुढील काही दिवसांत वाटाघाटी होऊन महायुती स्थिरावेल, अशी शक्यता गृहीत धरली जात आहे.
महाविकास आघाडीत अपेक्षेनुसार शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीता गुरव यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. महायुतीत भाजपकडून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी नेहा काकडे यांचे नाव अंतिम झाले आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने शहरातील विविध प्रभागांत उमेदवार उभे केले असून, माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहे.
एकूणच, वरवर सरळ वाटणाऱ्या धाराशिव नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षांतील फूट, उमेदवारीतील गोंधळ आणि स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे स्पर्धा चुरशीची होणार हे निश्चित.









