आमदार प्रवीण स्वामींचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
आरंभ मराठी / उमरगा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्याच्या हस्ते वाटप केल्याच्या प्रकरणावरून उमरगा तालुक्यात प्रशासन व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांनी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व तहसीलदार गोविंद येरमे यांच्यावर सात दिवसांच्या आत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र पाठवले आहे.
‘दैनिक आरंभ मराठी’ ने सर्वप्रथम याबाबतीत वृत्त प्रकाशित केले होते.
शासनाच्या निधीचे वाटप हे एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या उपस्थितीत केल्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष शुभारंभ झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. या प्रकारानंतर विरोधकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत जाब विचारला. तसेच आमदार प्रवीण स्वामी यांनी १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात या प्रकाराला “अवैध व आचारसंहितेचे उल्लंघन करणारे” ठरवत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्रात आमदार स्वामी यांनी नमूद केले आहे की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत जाहीर केली असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी ही मदत एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याच्या हस्ते वाटप करून शासकीय कार्यात राजकीय पक्षाची छाप उमटवली आहे.
ही कृती प्रशासनाच्या निष्पक्षतेला तडा देणारी असून, अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे उमरगा तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.