१५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
रांजणीच्या नॅचरल शुगरने सर्वात जास्त गाळप व साखर उत्पादन घेऊन जिल्ह्यात बाजी मारली. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.
तरीही जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडला. सध्या काही कारखाने बंद झाले आहेत, तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी गाळप हंगामात आतापर्यंत एकूण २३ लाख २७ हजार ६३ टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामधून १५ लाख १६ हजार ३७१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वात जास्त ११.१६ टक्के साखर उतारा असलेल्या कंचेश्वर शुगर मंगरूळ या कारखान्याने २ लाख २० हजार १६० टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून २ लाख ४३ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केले. भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १ लाख १९ हजार ५५ टन ऊस गाळप करून, ८० हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केली. मुरूम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याने १ लाख ८२ हजार २१५ टन ऊस गाळप करून १ लाख ८० हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत २ लाख ३ हजार ३८४ टन ऊस गाळप करून एकूण १ लाख ७८ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन काढले.
भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याने ९९ हजार ३६५ टन ऊस गाळप करून ८९ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील क्विनर्जी इंडस्ट्रीज भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने ४ लाख २ हजार ७९० टन ऊसाचे गाळप करून १ लाख १२ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन काढले. या साखर कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे,
परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने १ लाख ३२ हजार ९९० टन ऊसातून ६५ हजार क्विंटल साखर काढली. लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याने ८६ हजार ७५० टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून ५७ हजार ७२० क्विंटल साखर काढली.
एकंदरीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अंत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही २३ लाख २७ हजार ६३ टन ऊसाचे गाळप करून १५ लाख १६ हजार ३७१ क्विंटल साखर उत्पादन घेतले.