भोसले हायस्कूलच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप,
भोसले हायस्कूलमधील फिजिक्सवाला ऑफलाईन क्लासेसचा शुभारंभ
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव येथे स्वस्तिक मंगल कार्यालयामध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व फिजिक्सवाला यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांवर गुण घेणाऱ्या 350 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.तसेच भोसले हायस्कुलमधील फिजिक्सवाला ऑफलाईन क्लासेसचा शुभारंभ करण्यात आला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य कै. के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यालयाच्या निकालाचा घोषवारा वाचून दाखवला.
आपल्या प्रास्ताविकामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी संस्थेची १९६२ पासून आजपर्यंतची वाटचाल कशी झाली, आपण कोणकोणत्या गोष्टी धाराशिव जिल्हयासाठी शिक्षण क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्या व काळाची गरज ओळखून अलख पांडे यांच्या फिजिक्सवाला सारख्या नामांकित संस्थेच्या साहाय्याने धाराशिव जिल्हयात नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणू असा विश्वास विद्यार्थी व पालकांना त्यांनी यावेळी दिला.
आपल्या भाषणात फिजिक्स वालाच्या माध्यमातून अभियंत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी म्हणजे नीट व जेईईसाठी असलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली किंवा कोटा या ठिकाणी जाण्याची गरज उरणार नाही. फिजिक्स वालाच्या माध्यमातून आपल्याला ‘धाराशिव पॅटर्न’ सुरू करायचा आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ‘फिजिक्स वाला’ या उपक्रमाचे कौतुक देखील केले. तसेच धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव यांनी विद्यार्थ्यांनी कमी गुण व अपयशाने खचून न जाता ध्येय ठेवून फिजिक्स वाला सारख्या उपक्रमाचा फायदा करून घ्यावा असे सांगितले.
फिजिक्स वालाचे अजय चौहान यांनी फिजिक्स वालाची वाटचाल, क्लासरूम, रिकॉर्डिंग, पी डब्ल्यू ॲप, स्टडी मटेरियल याविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे कष्ट व स्टडी मटेरियल हेच त्यांच्या यशाचे कारण सांगितले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी बोर्ड परीक्षेत ९० % पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यालयातील १७३ विद्यार्थ्यांसह विद्यालयात १००% टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम आलेल्या कु. श्रावणी जयप्रकाश पवार व श्रेयस लालासाहेब पवार, जिल्ह्यातील इतर शाळांमधील पृथ्वीराज भागवत पाटील, गोसावी आसावरी अशोक, अडसूळ कृष्णा विलास, गोरे अक्षरा धनंजय, लटके भाग्यश्री ज्ञानेश्वर तसेच धाराशिव जिल्ह्यातील एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून फ्लाईंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मधील सीबीएसई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभासाठी व फिजिक्स वालाच्या उद्घाटनासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव , उपशिक्षणाधिकारीजि.प. (मा.) लांडगे साहेब तसेच ‘फिजिक्स वाला’ चे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या दिमाखदार सोहळ्यात इयत्ता आठवी ते बारावी साठी असलेल्या ‘फिजिक्स वाला’ ऑफलाईन क्लासचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी फिजिक्सवालाचे स्कूल पार्टनरशिप बिझनेस ऑपरेशन हेड अकुंश रुपेला, सेंट्रल अकॅडमी हेड शुभम दुबे, सेंट्रल अकॅडमी हेड अजय चौहान, सिनियर मॅथ्स फॅकल्टीचे प्रवीण अग्निहोत्री तसेच संस्था सदस्य तथा वित्त प्रशासकीय अधिकारी संतोष कुलकर्णी, प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, सर्व संस्थेचे सदस्य व पदाधिकारी तसेच सर्व पर्यवेक्षक, सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस. के. कापसे व एस.सी. पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.