आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत असलेल्या डीआयसी रोडवर अपघात टाळण्यासाठी बसवण्यात आलेले स्पीड ब्रेकरच अपघात वाढीचे कारण ठरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्रीतूनच या चकचकीत व शहरातील एकमेव सुसज्ज रस्त्यावर सहा ते सात ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आले.
मात्र, हे स्पीड ब्रेकर बसवताना कोणतीही पूर्वसूचना फलक, सावधगिरीची चिन्हे किंवा वाहनचालकांना सतर्क करणारे पांढरे-पिवळे पट्टे रस्त्यावर मारण्यात आले नाहीत. याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून 18 डिसेंबर रोजी या डीआयसी रोडवर एकाच दिवशी पाच अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या. अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळेच अपघात वाढल्याचा हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार धाराशिव शहरात चर्चेचा विषय ठरला.
या गंभीर बाबीकडे ‘दैनिक आरंभ मराठी’ ने गुरुवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी लक्ष वेधत बातमी प्रसिद्ध केली होती.
अपघात होऊ नये म्हणून बसवलेल्या स्पीड ब्रेकरमुळेच अपघात; डीआयसी रोडवर सकाळपासून पाच अपघात
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने अर्धवट उपाययोजना करत माणिक चौक येथील एका स्पीड ब्रेकरजवळ फक्त पांढरे पट्टे मारले आहेत.

मात्र नियमानुसार स्पीड ब्रेकरवर स्पष्टपणे दिसणारे पांढरे व पिवळे पट्टे असणे आवश्यक असताना केवळ पांढरे पट्टे मारल्याने ते वाहनचालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी स्पष्टपणे दिसत नाहीत. इतर ठिकाणच्या स्पीड ब्रेकरवर तर अद्याप एकही पट्टा मारलेला नसल्याने मागील दोन दिवसांत अपघातांचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक नियमांनुसार स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी थर्मोप्लास्टिक पट्टे, रिफ्लेक्टीव्ह पट्टे किंवा स्पष्ट पांढरे-पिवळे पट्टे देणे बंधनकारक आहे. तसेच स्पीड ब्रेकर येण्याआधी किमान 40 मीटर अंतरावर वाहनचालकांना सतर्क करणारे पट्टे किंवा सूचना असणे आवश्यक असते. प्रत्यक्षात या रस्त्यावर यातील एकही नियम पाळला गेलेला दिसून येत नाही.
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी स्पीड ब्रेकरवर रिफ्लेक्टर बसवणे आवश्यक असताना तेही बसवण्यात आलेले नाहीत. स्पीड ब्रेकरची कोणतीही ठोस सूचना नसल्यामुळे एखादा गंभीर अपघात घडून त्यामध्ये कोणाला जीव गमवावा लागल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अपघात टाळण्याच्या नावाखाली नियमांकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने सर्व स्पीड ब्रेकरवर नियमानुसार स्पष्ट सूचना, पांढरे-पिवळे रिफ्लेक्टीव्ह पट्टे व रिफ्लेक्टर बसवावेत, अन्यथा या रस्त्यावर अपघातांची मालिका थांबणे कठीण होणार आहे.









