आरंभ मराठी / धाराशिव
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणास अखेर सुरुवात झाली असून बुधवारी दुपारी चार वाजल्यानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होऊ लागली आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता लागू असल्याने या काळात हप्ता मिळेल की नाही, अशी शंका लाडक्या बहिणींमध्ये व्यक्त केली जात होती. मात्र शासनाने सर्व अडथळे दूर करत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्यांची प्रतीक्षा होती. त्यापैकी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मासिक खर्च भागविण्यास मोठी मदत होत असून घरगुती अर्थकारणाला हातभार लागत आहे.
धाराशिव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे साडेतीन लाख पात्र महिलांना लाभ मिळणार असून जवळपास ५० कोटी रुपयांचे थेट त्यांच्या खात्यावर वितरण होणार आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीमुळे रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होत असल्याने पारदर्शकता राखली जात आहे.
आचारसंहिता लागू असतानाही शासनाने योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवल्यामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.









