आरंभ मराठी / धाराशिव
5 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूम तालुक्यातील चिंचपुर ढगे येथील एका डॉक्टरने पाच महिन्याच्या गर्भवती महिलेचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याची घटना घडली असून, याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. नंदकुमार रामलिंगप्पा स्वामी (वय ५७ वर्षे, रा. चिंचपुर ढगे, ता. भुम, जि. धाराशिव, ह.मु. दत्तनगर, बार्शी, जि. सोलापूर) यांनी १२ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान चिंचपुर ढगे येथील आपल्या शेतात फिर्यादी सविता संतोष बनसोडे (वय २५ वर्षे, रा. विजोरा, ता. वाशी, जि. धाराशिव) हिला गाडीत झोपवून, गाडीत असलेल्या वैद्यकीय उपकरणाद्वारे तपासणी केली.
फिर्यादी ही पाच महिन्यांची गर्भवती असतानाही, डॉक्टर स्वामी यांनी तिला गर्भपातासाठी औषध (गोळी) खाण्यास भाग पाडले. ती गोळी घेतल्याने फिर्यादीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या व अखेर तिचा गर्भपात झाला. यानंतर फिर्यादीच्या पतीने त्या डॉक्टरांच्या शेतातच अर्भक पुरले.
याबाबत विचारणा केल्यावर झालेल्या वादात डॉक्टरांनी फिर्यादीच्या पतीस मारहाण केल्याचेही फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी सविता बनसोडे यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम ८९, २३८ तसेच ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.