आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत शुक्रवारी सायंकाळी उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती परभणी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) या पदावर करण्यात आली आहे.
या आदेशानुसार सौ. जाधव यांनी धाराशिव येथील पदमुक्त होऊन नव्या पदावर तत्काळ कार्यभार स्वीकारावा, असे शासनाने निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी बदलाबाबतच्या नियमानुसार ही बदली करण्यात आली असून, त्यांच्याजागी कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शासनाचे हे आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत.









