पोलिसांची साथ, आळणी पाटी, चोराखळी भागात कलाकेंद्रांचे पीक फोफावले, कलाकेंद्रांवर नको ते धंदे, हाणामाऱ्या वाढल्या
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात विशेषतः धुळे-सोलापूर महामार्गालगत आळणी फाटा, चोराखळी भागात देवीच्या नावाखाली सुरू झालेली तथाकथित कलाकेंद्र आता गुन्हेगारी, अश्लीलता आणि वाईट प्रवृत्तींचा अड्डा बनली आहेत.
आळणी पाटी, धाराशिव साखर कारखाना परिसर,वडगाव (ज) या भागांत अशा केंद्रांची रेलचेल असून, यातील अनेक केंद्रे विना परवाना, बेकायदेशीर सुरू आहेत. कला आणि संस्कृतीच्या नावाखाली इथे नाचगाणी, डीजे, बेकायदेशीर बैठक, दारुड्यांचा जल्लोष, पैशांची उधळपट्टी आणि वर्चस्वासाठी हाणामाऱ्या सुरू असतात.
दहा हजारांपासून पन्नास हजार, अगदी लाखोंपर्यंत पैशांचा उधळा होतो. यावरून अनेकदा गाणी तोडणेसारख्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामाऱ्या होतात, काठ्या, चाकू, पिस्तुल काढली जातात आणि रक्तरंजित वाद होतात.
गेल्या आठवड्यात एका कलाकेंद्रावर गोळीबाराची घटना घडली, तरीही या कलाकेंद्रांचा उच्छाद कमी झालेला नाही. या कलाकेंद्राला तर आपली परवानगी नसल्याचे येरमाळा पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्हा व राज्याबाहेरील लोकही येथे येतात.
काही गुन्हेगार मानसिकतेचे लोक मौजमजेसाठी येतात आणि गुन्हेगारीला खतपाणी घालतात. हे सर्व पोलिसांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या नजरेसमोर चालत असतानाही कारवाई मात्र होत नाही. उलट, स्थानिकांच्या मते, या केंद्रांच्या मालकांना पोलिसांचा वरदहस्त लाभत आहे.
देवतांच्या नावाचा वापर, राग का येत नाही..?
सगळ्यात संतापजनक म्हणजे, या कलाकेंद्रांना देवींची नावे दिली जातात.कालिका, महाकाली अशी देवीची नावे दिली जातात. देवीच्या नावाखाली पापाचे दुकान चालवणे हा धर्म, भक्ती आणि संस्कृतीचा उघड अपमान नाही का ? एरव्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी चुकीचे घडते, तेव्हा काही संघटना आक्रमक होतात, मग इथे का नाही ? धार्मिक भावना फक्त निवडक प्रसंगातच जाग्या होतात का ? देवीभक्तांना, समाजाला आणि धर्मसंवेदनशीलांना हा प्रश्न का पडत नाही.
ड्रग्सपेक्षाही घातक, पिढीला धोका,
या कलाकेंद्रांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, हिंसक प्रवृत्ती वाढत आहे, शिक्षण आणि करिअरपासून दूर जात आहे. ड्रग्सप्रमाणे या कलाकेंद्रांची व्याप्ती नव्या पिढीसाठी घातक ठरत आहे. हाणामाऱ्या, गोळीबार, अशा घटना वाढत आहेत आणि जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. 4 दिवसांपूर्वी उमरगा तालुक्यात खुनाची घटना घडली होती. या घटनेत कालिका कला केंद्रातील 3 महिला आरोपी आहेत,हे विशेष.
जबाबदार लोकांनी केले बेदखल,
पोलिस, प्रशासन आणि समाजातील जबाबदार लोकांनी डोळेझाक करून या अड्ड्यांना वाचवायचे का, की पुढील पिढीला गुन्हेगारीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी कठोर कारवाई करायची? देवीच्या नावाखाली चालणाऱ्या या पापाच्या बाजारावर कायमची बंदी घालून त्याला साथ देणाऱ्यांनाही उघड करणे गरजेचे आहे.
अन्यथा तरुण मुले धोक्याच्या मार्गावर, चुकीच्या वाटेवर जाणार आणि पिढीला बरबाद होण्यापासून आपण वाचवू शकणार नाही. त्यासाठी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाऊ नये अशी अपेक्षा.