उमरग्यात ‘रवी’किरणला झळाळी!
जाणून घ्या कारणे..
आरंभ मराठी/ धाराशिव
गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार, उमरग्याचे माजी आमदार प्रा. रवींद्र गायकवाड (रवी सर) यांची एक छेडछाड केलेली व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. रवी सर त्यात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलत आहेत, असा भास एेकणाऱ्याला होत असे. त्यामुळे उमरग्याबाहेरील मुस्लिम समाजात नाराजी पसरली होती.
उमरग्यातील मुस्लिम समाज मात्र रवी सरांवरील या नाराजीमुळे अस्वस्थ होता. कारण, रवी सर कदापिही अशी भाषा कोणत्याही समाजाच्या बाबतीत वापरणार नाहीत, याची खात्री तालुक्यातील सर्वांनाच होती.
हे आता आठवले, त्यामागे आहे उमरगा नगरपालिका निवडणुकीचा निकाल. उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रवी सरांचे पुत्र किरण गायकवाड यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ते तब्बल सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन ते विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि काँग्रेस यांची आघाडी होती, हे विशेष. भाजपने स्वबळ आजमावले. रवी सरांनी ज्यांना दोनवेळा नगराध्यक्ष केले ते अब्दुल रज्जाक अत्तार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभे होते, मात्र त्यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपचे हर्षवर्धन चालुक्य दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
तर मूळ विषय असा की, गेल्या लोकसभा निवडणुकीत रवी सरांचा जो छेडछाड केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याबद्दल त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मुस्लिम समाजासह सर्वाच समाजांत नाराजी होती. या निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेसोबत असल्यामुळे मुस्लिम मतदारांची सोय झाली आणि त्यांनी रवी सरांवरील प्रेम दाखवण्याची संधी साधली. परिणाम, किरण गायकवाड यांचा दणदणीत विजय! भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास या निवडणुकीत गळून पडला आहे.
नगराध्यक्षपदाची निव़णूक लढवण्याचा अट्टाहास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला महागात पडणार आहे. केवळ आरोप आणि विरोधकांवर टीका यावरच राजकारण होणार नाही, असा संदेश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमरग्याच्या मतदारांनीही दिला आहे.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला. विजयी झाले असते तर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली असती, याची जाणीव लोकांना नंतर झाली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या भावनेचाही किरण गायकवाड यांना फायदा झाला. याशिवाय, विरोधकांवर टीका टाळून केलेली कामे आणि भविष्यात काय करणार, यावरच किरण गायकवाड यांच्या ‘थिंक टँक’ने भर दिला. याचा मोठा फायदा झाला.
भाजपने या निवडणुकीकडे आत्मपरीक्षण म्हणून पाहिले पाहिजे. आपण कोणासबोत फिरतो, आपल्या व्यासपीठावर कोणाला जागा देतो, ते लोक काय बोलतात आदी बाबींवर लोक गांभीर्याने विचार करत असतात. केवळ आणि केवळ मतविभाजनाच्या गणितावर विजय मिळेलच असे नसते.
मतविभाजनाचा खेळ संबंधित समाजाच्या लक्षात आला आणि भाजपसह ठाकरे गटाची गोची झाली. प्रा. रवींद्र गायकवाड हे लोकांमध्ये सहज मिसळणारे नेते आहेत. पुत्र किरण गायकवाड यांच्यातही हा गुण आहे. शिवसेनेत असले तरी धर्मनिरपेक्षता हा प्रा. गायकवाड यांच्या राजकारणाचा मुख्य आधार आहे. उमरग्याच्या मतदारांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.









