आरंभ मराठी / धाराशिव
आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र आरोग्यजागर केला जात असताना धाराशिव जिल्ह्यासाठी मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने आज ४०३ कोटी ८९ लाख रुपयांच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे धाराशिवच्या मेडिकल कॉलेजच्या बांधकामास आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.
आमदार राणा पाटील यांनी या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला होता. धाराशिव मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी ४०३ कोटी ८९ लाख रुपये खर्चून ८,२६,००० चौरस फुट क्षेत्रावर भव्य बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये १०० विद्यार्थी क्षमता असणाऱ्या मेडिकल कॉलेजची भव्य इमारत, ४३० खाटांचे रुग्णालय, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, डीन बंगला, कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स, गेस्ट हाऊस, सिक्युरिटी केबिन यांचा समावेश असणार आहे.
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली. जागतिक आरोग्य दिनी हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत.