आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव, लोहारा, तुळजापूर आणि उमरगा या चार तालुक्यासह जिल्ह्यात तब्बल 14 घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. धाराशिव शहरातून या चोरट्याला पकडण्यात आले.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 18 जुलै रोजी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार हे त्यांच्या पथकासह धाराशिव शहरात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोहारा पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणारा संशयित आरोपी धर्मेंद्र ऊर्फ काळ्या विलास भोसले (वय 23 वर्ष रा. शिंदगाव ता तुळजापूर, ह. मु. जेवळी ता. लोहारा) हा धाराशिव शहरात आहे. अशी बातमी मिळाल्यावर त्याला पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे जिल्ह्यातील घरपोडीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने मुरूम, लोहारा, नळदुर्ग, तुळजापूर च्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यावरून धाराशिव जिल्हा पोलीस गुन्हे अभिलेख तपासले असता त्याच्या कडून एकूण घरपोडीचे 14 गुन्हे उघडकीस आले.
नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, त्याने त्याच्या वाट्याला आलेला चोरीचा मुद्देमाल हा त्याने एका सोनारास ते दागिने त्याच्या पत्नीचे आहेत असे सांगून विकले असल्याचे सांगितले. त्या सोनाराकडून एकूण 70 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 6,30,000 रुपये चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह त्याला लोहारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मागील काही काळापासून धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्या आहेत. यातील आरोपी पकडल्यामुळे टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यास मदत होणार आहे.