आरंभ मराठी / धाराशिव
गावठी कट्टा बेकायदेशीरपणे जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकी येथून ताब्यात घेतले. यासंबधी सविस्तर बातमी अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, ढोकी येथील तेरणा साखर कारखान्या समोरील पारधी पेढी येथे एका अल्पवयीन मुलाकडे अवैधपणे बाळगलेला गावठी कट्टा आहे.
खात्रीलायक बातमी मिळाल्याने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पोलिसांनी तिथे जाऊन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने गावठी कट्टा त्याच्या घरामध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी दोन पंचासह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्याने एका लाकडी कपाटातील गावठी कट्टा पोलिसांना आणून दिला. पोलिसांनी पंचनामा करून 15,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला. तसेच त्या अल्पवयीन मुलाला गावठी कट्ट्यासह ढोकी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशान्वये, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण यांच्या पथकाने केली.