आरंभ मराठी / धाराशिव
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने धाराशिव नगरपालिका परिसरात सकाळपासूनच प्रचंड धांदल, गडबड आणि पळापळ पाहायला मिळत आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आवारात मोठी गर्दी केली आहे.
कागदपत्रांची पूर्तता, तपासणी आणि अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः लगबग सुरू आहे. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने अचानक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने आज अनेक ठिकाणी समीकरणांमध्ये बदल झाले. पक्षाने काही उमेदवारांना तातडीने अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्याने पालिकेच्या आवारात त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी हालचाल दिसून आली.
महाविकास आघाडीत आता शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. दुसरीकडे महायुतीत अद्याप अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याने तिघाही पक्षांचे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक इच्छुक उमेदवार स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यामुळे महायुतीतदेखील गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे.
रविवारी नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १० उमेदवारी अर्ज, तर नगरसेवक पदासाठी १७९ अर्ज दाखल झाले होते. तर सोमवारी अंतिम दिवशी पहिल्या एका तासातच नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी २३ अर्ज दाखल झाले आहेत. दुपारपर्यंत ही संख्या झपाट्याने वाढत असून आजही एकूण अर्जांची संख्या १०० पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालिकेतील सर्व नामनिर्देशन स्वीकृती टेबलांवर मोठी गर्दी झाली असून, प्रत्येक टेबलसमोर १५ ते २० उमेदवार अर्ज तपासणीसाठी थांबलेले दिसतात. पालिका कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून गर्दी नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धाराशिव नगरपालिकेत एकूण २० प्रभागांमधून ४१ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
यासोबतच नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आघाड्या-जुळवाजुळव, तिकीट वाटप आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आलेले उधाण संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे.









