आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर येथे सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवात दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या हत्यारबंद टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी पकडण्यात आलेले पाचही आरोपी शेजारच्या बीड जिल्ह्यातील असून त्यांच्या नावावर खून, चोरी, दरोड्याच्या अनेक तक्रारी असल्याचे समोर आले आहे.
नवरात्र उत्सवात काही गंभीर घटना घडण्याच्या अगोदरच आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधिक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके यांचे पथक तुळजापुर शारदीय नवरात्र महोत्सव दरम्यान मालाविषयी गुन्हयांस प्रतिबंध करण्याकरिता तुळजापुर शहरात गर्दीचे ठिकाणी पायी पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी पथकास गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नळदुर्ग ते तुळजापुर जाणाऱ्या बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनामध्ये काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले आहेत. माहिती मिळाताच पथकाने रविवारी (दि.21) रात्री सव्वासात वाजता जाऊन पाहणी केली.
पथकाला तिथे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (क्र.एम.एच.11 एके 9621) दिसली. पोलीस त्या कारजवळ जात असताना त्यांना पाहून कारमधील दोन व्यक्ती पळून जाऊ लागल्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच कारमधील इतर तिघांना देखील ताब्यात घेतले. कारमध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच हत्यारे आढळून आली.
पकडलेल्या आरोपींची नावे रोहीत ऊर्फ तात्या अंकुश गायकवाड (वय 36 वर्षे रा. सुभाष कॉलनी, बीड), अमर आसाराम गायकवाड (वय 23 वर्षे रा. नळवंडी नाका, बीड), राजेश अभिमान जाधव (वय 27 वर्षे रा.च-हाटा, ता.जि. बीड), राजाभाउ ज्ञानदेव यादव (वय 25 वर्षे रा.वांगी ता.जि.बीड) आणि प्रशांत दिलीप डाके (वय 25 वर्षे रा. स्वराज्य नगर, बीड) अशी आहेत.
पाचही आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरोडा टाकणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि त्यांच्या सर्व पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.