धाराशिव न्यायालयाचा निकाल
धाराशिव : आरंभ मराठी
धाराशिव जिल्ह्यातील गडदेवधरी शिवारात घडलेल्या खुनाच्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.आवटे यांनी तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी ११ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ११ महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.
१८ नोव्हेंबर २०२१ रोजी कृष्णा शिवशंकर कोरे हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार ढोकी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्याच दिवशी आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गडदेवधरी शिवारात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळला. डीएनए तपासणीत मृतदेह हा कृष्णा कोरे याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मयताच्या मोबाईलवरील ऑनलाईन व्यवहारांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. हॉटेल मेघदूत शिंगोली येथे मोबाईलवरून दारूसाठी पैसे भरल्याचे आढळले. तेथील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा माग काढला गेला. रमेश भगवान मुंडे (३५, रा. कोयाळा, धारुर), शिवशंकर हरिभाऊ इंगळे (२७, रा. इंगळेवस्ती, केज) आणि अमोल अशोक मुंडे (३१, रा. कोयाळा, धारुर) यांना अटक करण्यात आली.
आरोपींनी पिकअप गाडीतून प्रवास करत असताना कृष्णा कोरे याला लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान त्यांनी दारूसाठी पैसे मागितले. मात्र नकार मिळाल्याने आरोपींनी त्याला लोखंडी टॉमीने मारहाण केली. मोबाईल हिसकावून त्यावरून २१०० रुपये हॉटेल मेघदूत येथे ऑनलाईन दिले, तसेच रिक्षाचालकाकडून मोबाईलवरून ३५०० रुपये ट्रान्सफर करून ३२०० रुपये रोख घेतले. नंतर गडदेवधरी शिवारात नेऊन गळा दाबून खून केला आणि मृतदेह नग्न अवस्थेत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
तपास अधिकारी टी.बी. दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले. मृताचे साहित्य जप्त करण्यात आले. हॉटेल मालक, वेटर, रिक्षाचालक यांचे जबाब नोंदवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज व बँक डिटेल्स पुरावा म्हणून वापरण्यात आले.
सरकारी वकिलाचा प्रभावी युक्तिवाद,
सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी अभियोग पक्षाकडून २७ साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. अखेर १८ सप्टेंबर २०२५ रोजी जन्मठेपेची शिक्षा व दंड सुनावण्यात आला.