2020 ते 2022 पर्यंतचे विशेष लेखा परीक्षण करण्यास स्थानिक निधी लेखा परीक्षण संचालनालयाची मंजुरी
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर पालिकेच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. अनेकवेळा तक्रारी करूनही तपासात अपेक्षित गती मिळत नव्हती. पोलीस विभागामार्फत नेमलेल्या एसआयटीकडून तपास न झाल्याने आमदार सुरेश धस आणि धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार स्थानिक निधी लेखा परीक्षण संचालनालयाने नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रादेशिक स्थानिक लेखापरीक्षण कार्यालयामार्फत 2020 ते 2022 या काळातील लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या लेखा परीक्षणानंतर नगर पालिकेत नेमका किती कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, हे स्पष्ट होणार आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालनालयाने बुधवारी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
तत्कालीन मुख्याधिकारी हरी कल्याण यलगट्टे आणि वसुधा फड यांच्या कार्यकाळात नगर पालिकेत अनेक भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. या एकूण भ्रष्टाचाराची चौकशी मात्र केली जात नव्हती. आमदार सुरेश धस यांनी गेल्या चार वर्षापासून हा मुद्दा विधान परिषद आणि विधानसभेत लावून धरला आहे. त्यांच्या या मागणीवरून 6 महिन्यापूर्वी पोलीस विभागामार्फत (एसआयटी) विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचे पोलीस महासंचालकांनी आदेश दिले होते.
आदेशानुसार तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी विशेष तपास पथक नेमले. मात्र या पथकाने तपास केला नाही.उलट पथकाने स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागामार्फत लेखा परीक्षण करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेतील एकूण कामांची चौकशी करण्यासाठी स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालनालयाला पत्र दिले होते.
त्यात स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयामार्फत 2020 ते 2022 या काळातील लेखा परीक्षण करण्याची विनंती संचालनालयाकडे करण्यात आली होती. त्यावर आमदार सुरेश धस यांनीही सरकारकडे स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयामार्फत नगरपालिकेतील लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी केली होती.
या मागणीनुसार बुधवारी स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालनालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, छत्रपती संभाजी नगर येथील प्रादेशिक स्थानिक निधी लेखा परीक्षण सहसंचालक कार्यालयाला तसे आदेश दिले आहेत.त्यामुळे 2020 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीतील तसेच मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या कार्यकाळातील विशेष लेखा परीक्षण करण्यात येणार आहे.
स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालनालयाने सहसंचालकांना हे दिले आदेश
धाराशिव नगरपरिषद अंतर्गत कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षणास मंजूरी देतानाच पत्रात म्हटले आहे की, आमदार सुरेश धस आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांनी धाराशिव नगर परिषदचे माहे जुलै २०२० ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण करणेबाबत संचालनालयास विनंती केली आहे. त्यानुषंगाने मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम १९३० मधील कलम ३ (इ) व मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्ष नियम १९३१ मधील नियम १५ च्या तरतुदी विचारात घेऊन आपणास पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :
धाराशिव नगर परिषदेतील गैरकारभाराच्या सदंर्भात (कालावधी ६ जुलै २०२० ते तत्कालीन अधिकारी श्री. हरीकल्याण येलगट्टे व श्रीम. वसुधा फड यांचा कार्यकाल) जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालातील मुद्द्यांच्या अनुषंगाने माहे जुलै २०२० ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव यांचेमार्फत करणेस मान्यता देण्यात येत आहे. सदर विशेष लेखापरीक्षण सन २०२३-२०२४ चे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नियमित लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम प्राधान्याने हाती घेण्यात यावे.
संचालनालयाचे परिपत्रक क्र.०६ दि.०७.०३.२०२२ नुसार विशेष लेखापरीक्षण अहवालाचे पुनर्विलोकन व अंतिमीकरण सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, छ. संभाजीनगर विभाग यांनी करून संबंधिताना अहवाल निर्गमित करावा व तसे संचालनालयास अवगत करावे.