शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
आरंभ मराठी / वाशी
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन नगर परिषद’ मोहिमेचा शुभारंभ करत संघटन मजबूत करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याद्वारे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
उद्या, शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यात त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार असून, परंडा ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होईल. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता परंडा येथील जाकिरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी परंडा नगर परिषद संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भूम येथील साहिल फंक्शन हॉलमध्ये भूम नगर परिषद पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडेल. त्यानंतर दुपारी १ वाजता त्याच ठिकाणी भूम ग्रामीण भागातील पदाधिकारी बैठक होईल. दौऱ्याचा समारोप दुपारी ३ वाजता तांदुळवाडी येथील शिवशक्ती शुगर येथे वाशी तालुका व शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीने होणार आहे.
या सर्व बैठकींना आमदार डॉ. तानाजीराव सावंत मार्गदर्शन करणार असून, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा उंच फडकवण्यासाठी आवश्यक संघटनात्मक धोरणे निश्चित केली जाणार आहेत. जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळुंखे यांनी मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या दौऱ्यामुळे मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









