मदत मिळणार तरी कधी.?, सरकारचे नाटकी आश्वासन, शेतकरी अस्वस्थ
चंद्रसेन देशमुख /आरंभ मराठी
धाराशिव:
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यावर आभाळ कोसळत आहे. जिल्ह्यात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने चार जणांचे प्राण घेतले, ८१ जनावरे दगावली, ५४१ घरे कोसळली, सहा शाळा जमिनदोस्त झाल्या. धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम, कळंब प्रत्येक तालुका या आपत्तीने उध्वस्त झाला आहे.
मात्र,सरकारच्या वतीने अजूनही वेळ मारून नेली जात आहे.मदतीचे पॅकेज जाहीर केले जात नाही.किंबहुना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे पावसाळी पर्यटन संपून 8 दिवस उलटले आहेत.पण सरकारला लाज कशी वाटत नाही, सरकार.ढोंग करत आहे,खोट्या सहानुभूतीने शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या आश्वासनाने शेतकऱ्यांचे, आपत्तीग्रस्तांचे पोट भरणार आहे का, सरकार मदत का जाहीर करत नाही,असा सवाल उपस्थित होत आहे.
15 दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला आहे.शासनाने ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केवळ हेक्टरी 8 हजारांची मदत जाहीर केली.वास्तविक पाहता त्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.मात्र,त्यावर मदतीचे नाव घेतले जात नाही.
केवळ 3 दिवसात म्हणजे 26 ते 28 तारखेपर्यंत
धाराशिव तालुक्यात २४५ घरे उद्ध्वस्त झाली. तुळजापूरात ९३, उमरग्यात १००, लोहाऱ्यात ४१, भूममध्ये २८, परंड्यात १२ आणि कळंबमध्ये २२ घरे कोसळली. याशिवाय धाराशिवात ४५ झोपड्या पूर्णपणे नष्ट झाल्या, २५ गोठे उद्ध्वस्त झाले. शेकडो कुटुंब अक्षरशः रस्त्यावर झोपत आहेत.
पूराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली. धाराशिवात २९, परंड्यात १६, भूममध्ये ११, उमरग्यात ९, तुळजापूरात ७, लोहाऱ्यात ५ व कळंबमध्ये ४ जनावरे मृत्युमुखी पडली. यापैकी ४७ मोठी जनावरे, २७ लहान तर ९ ओढकाम करणारी आहेत. 26 तारखेपूर्वी झालेले नुकसान वेगळे आहे. शेतकऱ्याच्या खांद्यावरील पिके वाहून गेली, आणि आता अंगणातली जनावरंही संपली.
धाराशिव तालुक्यातील
सहा शाळांची पडझड झाली. शिक्षणाची साधी आशाही मोडून पडली. पोराबाळांच्या डोक्यावर छप्पर नाही, शेतकऱ्याच्या अंगावर छप्पर नाही, जनावरांना चारा नाही, संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं आहे.
मंत्र्यांची केवळ मिरवणूक,मदतीचा पत्ता नाही,
या भयावह परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विरोधी नेते सगळेच आले, फेरी मारून गेले, धीर दिला, आश्वासने दिली. पण शेतकऱ्याच्या हातात मदतीचा एक रुपयाही पडलेला नाही! सरकार केवळ सांगत आहे की सोडणार नाही, मदत होईल, पण ती कधी ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शेतकरी आज अक्षरशः म्हणतोय पिकं वाहून गेली, जनावरं संपली, घरं उद्ध्वस्त झाली, आता सरकारची वाट बघत बसायचं, की गळफास घ्यायचा ?
काही भागात आत्महत्या सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्याचा धीर संपत चालला आहे.
शेतकऱ्यांना उशीर का?,मदतीची घोषणा अजून का नाही ? शेतकऱ्याचा श्वास थांबल्यावर का मदत मिळणार? तातडीने मदत जाहीर झाली नाही, तर शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर येईल आणि तो सरकारला झेपणार नाही.