आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील शेतीचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने आता मदत जाहीर केली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील ११ हजार २८० शेतकऱ्यांना सदरील नुकसानीपोटी ९ कोटी १ लाख ८५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे आंबा, पपई, केळी या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते.
या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील ४ हजार ९८८ हेक्टर क्षेत्राला बसला होता. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल विभागीय कृषी आयुक्तालयाला सादर केला होता. अवकाळी पावसाच्या नुकसानीबद्दल मराठवाड्याला ६० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये सर्वाधिक ११ कोटी ५९ लाखांची मदत लातूर जिल्ह्याला जाहीर करण्यात आली आहे. तर त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यासाठी ९ कोटींची मदत जाहीर झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात ही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट खात्यात डीबीटी द्वारे वितरित करण्यात येणार आहे.