आरंभ मराठी / धाराशिव
बनावट पेट्रोल पंप देण्याच्या बहाण्याने भूम तालुक्यातील एका नागरिकाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तांबेवाडी (ता. भुम) येथील 55 वर्षीय आकाश नानासाहेब शिंदे यांची तब्बल 37,99,500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवीन पेट्रोल पंप देण्याचे आमिष दाखवत संशयिताने मोबाईल क्रमांक 7362949329 वरून शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि प्रक्रियेसाठी मोठ्या रकमा जमा करण्यास सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. 15 सप्टेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 या दोन महिन्यांच्या अवधीत आरोपीने विविध कारणे सांगत तांबेवाडी येथून फोन-पे द्वारे तसेच भुम येथून आरटीजीएसद्वारे पैसे पाठवायला भाग पाडले.
या दरम्यान शिंदे यांनी एकूण 37,99,500 रुपये आरोपीने दिलेल्या 070901000034555 आणि 849610111113467 या खात्यांवर जमा केले. भरपूर रक्कम देऊनही पेट्रोल पंप मंजुरी किंवा प्रक्रियेविषयी कोणतीही माहिती न मिळाल्याने शिंदे यांना आपण फसवले गेल्याचा संशय आला.
घटनेची जाणीव होताच त्यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 318(4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) आणि 66(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस आरोपीचा शोध घेऊन पुढील तपास करत आहेत.









