तुळजाभवानी मंदिर संस्थानला दातृत्वाच्या परंपरेचा विसर
सांस्कृतिक कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांचा खर्च, शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात आखडता
सुरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर : गेल्या काही दिवसात जिल्ह्यासह मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी तर पूर्णपणे उध्वस्त झाला असून, त्यामुळे आता मदतीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मात्र कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या तुळजाभवानी मंदिर संस्थानने मात्र स्वतःच्या जिल्ह्यात एवढी भयंकर परिस्थिती असताना देखील अजूनपर्यंत तरी मदतीचा हात दिलेला नाही. विशेष म्हणजे सहा वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या महापुरात मंदिर संस्थांनकडून 50 लाखाची मदत करण्यात आली होती.
यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सप्टेंबर महिन्यात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत.
पुनर्वसनासाठी शासनाबरोबरच विविध ठिकाणाहून मदतीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या तुळजाभवानी मंदिर संस्थाननने आपल्या जिल्ह्यात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीसाठी मदतीची गरज असताना मंदिर संस्थानकडून मदत होत नसल्याने कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर ,सांगलीला गेली होती मदत
2019 साली कोल्हापूर, सांगली भागात मोठा महापुर आला होता. यावेळी मंदिर संस्थांनकडून 50 लाखांची मदत करण्यात आली होती. त्यामध्ये 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले होते. तर उर्वरित 25 लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात देण्यात आल्या होत्या.
पुण्यातील महापुरातही केली मंदिर संस्थांनने मदत,
1961 साली पुणे शहरात महापूर आल्यावर त्यावेळी मंदिर संस्थाननने रोख दहा हजार तसेच 27 हजार रुपयांच्या साड्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवल्या होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमावर कोट्यावधीचा खर्च,
नवरात्र महोत्सवात मंदिर संस्थांकडून सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असून जीवनाशी संघर्ष करत झगडत असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत तरी एक रुपयाची देखील मदत मंदिर संस्थांनकडून करण्यात आलेली नाही .
गतवर्षीचे मंदिर संस्थांनचे उत्पन्न 80 कोटी
गतवर्षीच्या आर्थिक वर्षात मंदिर संस्थानचे वार्षिक उत्पन्न 80 कोटी रुपये झाले होते मंदिर संस्थांनला सिंहासन पेटी, पेड दर्शन, त्यासह विविध वस्तूंचे निलावाद्वारे मोठे उत्पन्न मिळत असते, तसेच मंदिर संस्थांनच्या 274 कोटींच्या ठेवी देखील विविध बँकात असून त्यातून व्याजापोटीही मोठी रक्कम मंदिर संस्थाननला मिळत असते.