आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांवर नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांची आज सुनावणी पार पडली. एकूण आठ उमेदवारांवर आक्षेप नोंदविण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या सर्व आठही उमेदवारांना कालच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्या अर्जांवरील आक्षेपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.
सकाळी अकरा वाजता नगरपालिका सभागृहात सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. आक्षेप असलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह तसेच वकिलांसोबत उपस्थित राहून आपली बाजू मांडली. सुनावणीदरम्यान कोणताही गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सभागृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि नीता अंधारे यांनी दोन्ही बाजूंची मते शांतपणे ऐकून घेतली.
सर्व कागदपत्रांची तपासणी करून यावरील अंतिम निर्णय आज दुपारी अडीच वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या निकालानंतर संबंधित उमेदवारांचे अर्ज अंतिमतः स्वीकृत ठरणार की नाकारले जाणार हे स्पष्ट होणार आहे. काही उमेदवारांनी न्यायालयात जाण्याची तयारी देखील सुरू केली असल्याने निवडणूक प्रक्रियेतील ताणतणाव वाढले आहेत.
दरम्यान, नगरपालिका आवारात मोठी गर्दी उसळली असून, निकाल काय लागू शकतो याकडे समर्थकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. धाराशिव नगरपालिकेचे निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे.









