आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील एका आडत दुकानातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार कही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आडत दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. अखेर याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आडत दुकान क्रमांक २८, विठ्ठल श्रीरंग काकडे मार्केट यार्ड, धाराशिव येथे व्यवसाय करणाऱ्या आडतदारांनी ३७६ शेतकऱ्यांकडून विश्वासाने विक्रीसाठी दिलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता तब्बल ८ कोटी ८१ लाख ८९ हजार ८५७ रुपये इतकी रक्कम अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपी म्हणून सुनिल विठ्ठल काकडे (मयत), विठ्ठल श्रीरंग काकडे व मिनील विठ्ठल काकडे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
सदर फसवणूक ही दि. ३० सप्टेंबर २०२१ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी फिर्यादी पवन चंद्रसेन माकोडे (वय ५४ वर्षे), व्यवसायाने सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, धाराशिव यांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात प्रथम खबर दाखल केली.
फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की, बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ३७६ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विश्वासाने विक्रीसाठी संबंधित आडत दुकानात दिला होता. मात्र विक्रीनंतर शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम वेळोवेळी मागणी करूनही न देता आरोपींनी बेकायदेशीर कृत्य केले.
या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५), ३१८(३), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.










