आरंभ मराठी / धाराशिव
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने उमेदवारांना रात्री जागून अर्ज भरण्याची वेळ येत होती.
या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवरून अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याची मागणी होत होती. आयोगाने याची दखल घेत क्षेत्रीय स्तरावर परिस्थितीचा आढावा घेऊन अखेर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, आज शनिवार (दि. १५) आणि उद्या रविवार (दि. १६) या सुट्टीच्या दिवशीही दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांमध्ये युती व आघाडीच्या जागावाटपाचे चर्चासत्र अद्यापही सुरू असल्याने अनेक इच्छुक उमेदवार संभ्रमात होते.
अर्ज भरण्याची मुदत कमी असल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेकांचे अर्ज प्रलंबित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे ऑफलाईन अर्ज सादर करण्यास परवानगी मिळाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
उद्या रविवार असूनही अर्ज स्वीकारले जाणार असल्यामुळे इच्छुकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. ही सवलत मिळाल्यामुळे उमेदवारांची धांदल काही प्रमाणात कमी होणार असून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









