आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत आमदार
राणा पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करून तसा ठराव घेण्यास सांगितले.
पालकमंत्री सरनाईक यांनीही त्याला सहमती देऊन तसा ठराव घेतला. धाराशिव जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षी एक रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारने बंद केली.
तसेच विमा योजनेत मोठे बदल करून शेतकऱ्यांकडून हेक्टरी 1160 रुपये पीक विमा घेतला. मात्र, पीक विम्याच्या प्रीमियमची रक्कम जास्त असल्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही. धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 30 टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. जिल्ह्यातील 4 लाख 95 हजार 496 शेतकऱ्यांनी 3 लाख 96 हजार 114 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरला आहे.
परंतु, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने हेक्टरी किमान 17000 रुपये पीक विमा मिळेल असे सांगितले आहे. मात्र पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांना देखील वेगळी मदत द्यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राणा पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
या मागणीला पालकमंत्री सरनाईक यांनीही संमती दिली आणि तसा ठराव बैठकीचे घेण्यात आला. त्यामुळे पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळण्याच्या दृष्टीने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या पीक विम्याची दृष्टीने पीक कापणी प्रयोग सुरू आहेत जिल्ह्यातील 42 मंडळात एकूण 504 पीक कापणी प्रयोग होणार आहेत.
आतापर्यंत 289 पीक कापणी प्रयोग झालेले आहेत. यामध्ये सध्या हेक्टरी केवळ 4 ते 5 क्विंटल उत्पादन मिळत आहे. त्यामुळे पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळेल अशी आशा आहे.