आरंभ मराठी / धाराशिव
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत धाराशिव रोटरी क्लब व ट्रस्टतर्फे दिवाळीनिमित्त मदतीचा उपक्रम राबविण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील तुगाव, दुधगाव, खामगाव, रुई, कैडगाव या परिसरातील तेरणा नदीकाठच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचे वाटप करून रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
वर्षानुवर्षे विविध सामाजिक प्रकल्पांतून समाजातील गरजूंपर्यंत पोहोचणारा धाराशिव रोटरी क्लब यंदाही शेतकऱ्यांसाठी पुढे आला. अडीच हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या आणि गरजू ६० शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. याचबरोबर रोटरी नेत्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास धाराशिव रोटरीचे अध्यक्ष रणजीत रणदिवे, सचिव प्रदीप खामकर, पी.आर. काळे,चंद्रसेन पिसाळ, उदय तीर्थकर, शुरसेन घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
धाराशिव रोटरी क्लबचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा खरा आनंद ठरला आहे.