आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली असताना नगरपालिकेला मात्र खड्डे खोदण्याचाच आजार जडला आहे. शहरात भुयारी गटाराच्या नावाखाली सर्वत्र रस्ते फोडले जात असताना आता तर थेट बार्शी–बोरफळ राज्य महामार्गावरील सिमेंट रस्त्यावर डीएलसीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भुयारी गटाराच्या पाईप जोडणीसाठी रस्ता खोदण्यात आला आहे.
एकीकडे शहरातील रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी असलेली नगरपालिकाच दुसरीकडे भुयारी गटार, जलवाहिनीच्या कामासाठी जागोजागी खोदकाम करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भर पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. गेल्या चार वर्षांपासून शहरातील नागरिक खड्ड्यातून वाट काढत असताना पालिकेचे खोदकाम मात्र काही थांबायचे नाव घेत नाही.
बोरफळ ते बार्शी मार्गावरील जिजाऊ चौक ते भवानी चौक दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. एक बाजू पूर्णपणे खोदल्याने वाहतुकीचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असताना कामाची गती मात्र अत्यंत संथ आहे. सिमेंट रस्त्यावर डीएलसीचे काम पूर्ण झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोरील भागात नगरपालिकेच्या भुयारी गटार ठेकेदाराने पुन्हा याच रस्त्यावर बुलडोझर चालवला आहे.
आधीच कामे पूर्ण होण्यासाठी कमालीचा विलंब होत असताना आजवर झोप काढणाऱ्या ठेकेदारांना जाब कोण विचारणार, क्युरिंग झालेल्या सिमेंट रस्त्यावर खोदकाम करण्याची परवानगी नेमकी कोणी दिली, हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. मजबूत क्युरिंग झालेल्या नव्या सिमेंट रस्त्यावर खुलेआम खोदकाम सुरू असताना नागरिक प्रश्न विचारत नाहीत,हे आश्चर्य आहे. आता लोकनियुक्त कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले असून, पालिकेतील अधिकाऱ्यांची बेलगाम कार्यपद्धती थांबावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









