आरंभ मराठी / धाराशिव
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याची बातमी दैनिक आरंभ मराठीने दिली होती. दिनांक ९ जुलै रोजीच्या अंकात
‘अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची होतेय आर्थिक लूट’ या मथळ्याखाली वृत्त दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी फोन करून विद्यार्थ्यांची बाजू मांडल्याबद्दल आरंभ मराठीचे आभार मानले होते.
या वृत्तानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक पत्र काढून सर्व कॉलेजना पोर्टलवर जी फीस नमूद केली आहे, तेवढीच फिस विद्यार्थ्यांकडून घ्यावी जास्त फिस घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ११५ कॉलेजमध्ये अकरावी ऍडमिशन मध्ये विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या.
यावर आरंभ मराठीने वारंवार या विषयावर बातम्या प्रसिद्ध करून शिक्षण विभागाला जाब विचारले होते. आरंभ मराठीच्या बातमीचा दाखला देऊन युवा सेनेने देखील शिक्षण विभागाला निवेदन देऊन विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता.
त्यानंतर शिक्षण विभागाने पत्र काढून इयत्ता ११ वी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना शासन नियमानुसार फीस आकारावी व ऑनलाईन भरलेल्या माहिती मध्ये मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालय लातूर विभाग लातूर या कार्यालयास पत्रव्यवहार करून तात्काळ आवश्यक दुरुस्ती करून घावी.
प्रवेश प्रक्रीये बाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घावी. प्रवेश प्रक्रियेबाबत गैर प्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल असे पत्र काढले आहे. अकरावी ऍडमिशन प्रक्रियेतील सर्व कॉलेजच्या प्राचार्यांना हे पत्र काढण्यात आले आहे. या पत्रानंतर कॉलेजकडून ऑनलाइन पोर्टलवर फिस संदर्भात योग्य तो बदल करून तेवढीच फिस विद्यार्थ्यांकडून आकारली जाईल असे अपेक्षित आहे. आरंभ मराठी यापुढेही या विषयाचा पाठपुरावा करत राहील.