आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 अ, 7 ब आणि 14 ब या तीन प्रभागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याचबरोबर उमरगा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 4 ब, 5 अ आणि 11 अ या तीन प्रभागांसाठीही एकूण 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. मात्र, धाराशिवमध्ये आज होत असलेल्या मतदानाला मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत धाराशिव नगरपालिकेतील तीन प्रभागांमध्ये केवळ 27.31 टक्के मतदान झाले आहे. धाराशिव शहरातील 16 मतदान केंद्रासह संबंधित केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या तीन प्रभागांमध्ये एकूण 13 हजार 891 मतदार असून त्यामध्ये 7 हजार 255 पुरुष आणि 6 हजार 635 महिला मतदारांचा समावेश आहे.
दीड वाजेपर्यंत 2188 पुरुष मतदारांनी तर 1606 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून दीड वाजेपर्यंत एकूण 3794 मतदारांनी मतदान केले आहे. दुसरीकडे उमरगा नगरपालिकेत मात्र तुलनेने चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. उमरगा येथील तीन प्रभागांमध्ये एकूण 7 हजार 546 मतदार असून त्यामध्ये 3 हजार 777 पुरुष आणि 3 हजार 769 महिला मतदार आहेत.
दीड वाजेपर्यंत 1376
पुरुष मतदारांनी तसेच 1343 महिला मतदारांनी मतदान केले असून एकूण 2719 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उमरगा येथे दीड वाजेपर्यंत 36.03 टक्के मतदान झाले आहे.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून उर्वरित वेळेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते यांना मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. उर्वरित वेळेत मतदारांचा प्रतिसाद वाढतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








