आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील सात महसूल मंडळात शनिवारी पुन्हा एकदा अतिवृष्टीने हाहाकार माजवला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, पूल व वस्तीभाग जलमय झाले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल 171 टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही पावसाची अनियमित व अतिवृष्टी स्वरूपाची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम हातातून गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
यासोबतच पशुधनासाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे चाऱ्याची पिके नष्ट झाली असून शेतकऱ्यांकडे जनावरांना खाऊ घालण्यासाठी पर्याय उरलेला नाही. अनेक भागात जनावरे उपाशी राहण्याची वेळ येत आहे. पुढील काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहिली तर जनावरे चाऱ्यावाचून मरण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना पूरग्रस्तांसाठी करावयाच्या उपाययोजना बाबत आज सकाळी सूचना दिल्या. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर, त्यांना कपडे आणि अन्नधान्य पुरवणे याला सध्या प्रशासनाचे प्राधान्य आहे. पूरग्रस्त भागात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, आवश्यक त्या ठिकाणी पशुधनाचा चारा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शनिवारी सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
यामध्ये सलगरा येथे सर्वाधिक 131 मिमी पाऊस पडला. त्यानंतर ईट 88 मिमी, पारगाव 72, वाशी 68, तेरखेडा 68, येरमाळा 68 आणि भूम येथे 67 मिमी पाऊस पडला. परंडा आणि भूम तालुक्यातील काही भागात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
सीना-कोळेगाव, चांदनी आणि खासापुरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. आज पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.