आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव येथील समाजकल्याण कार्यालयात ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि.३१) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे (वय ३७) यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणातील तक्रारदार (पुरुष, वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये तर कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती.
याबाबत तक्रारदाराने धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने ४, ७ आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर एसीबीने दिनांक ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी पंचांसमक्ष सापळा कारवाई राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशय आल्याने आरोपीने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला व भेट टाळली. अखेर बुधवारी (दि.३१) आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या अंगझडतीत एक स्कूटर, वनप्लस कंपनीचा मोबाईल आढळून आले आहेत. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून आवश्यकता भासल्यास तो जप्त करण्यात येणार आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे (ला.प्र.वि. कार्यालय, धाराशिव) यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई पार पडली. सापळा पथकात विजय वगरे, आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी, शशिकांत हजारे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. वरिष्ठ मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांनी केले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी, तसेच त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक : 1064












