आरंभ मराठी/ धाराशिव
धाराशिव नगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक निष्ठावान शिवसैनिकांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी डावलली असून, त्यामुळे नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्हा पदाधिकारी, शिवसैनिक पक्षाबाहेर बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांच्यासोबत शहरातील प्रमुख पदाधिकारी आजपासून दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
शिवसेना उबाठा गटातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काही माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाला फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
धाराशिव शहरात शिवसेना उबाठा गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्य पक्षातून जोरदार इन्कमिंग सुरू होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना आश्वासन देण्यात आली होती. नगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अजून खऱ्या अर्थाने सुरू झालेला नाही.
अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी अखेरचा दिवस असून, आज आणि उद्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल.त्यानंतरच नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांचा राग, संताप काय आहे, याचा अंदाज येईल.
दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये आणखी कोण-कोण आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावर शिवसेनेच्या उमेदवारांना कसा फटका बसतो याचा अंदाज येईल.









