धाराशिवमध्ये निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाट्यमय घडामोडी
आरंभ मराठी / धाराशिव
पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना जिल्ह्यात महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडत धाराशिव जिल्ह्यातील सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्याने शिवसेना उबाठा गटावर नाराजी व्यक्त करत पक्षाने आघाडीपासून दुरावा ठेवत स्वतंत्र लढाईची भूमिका घेतली आहे.पक्षाला धाराशिव शहरात 41 पैकी केवळ 6 जागा मिळाल्या होत्या.
काल रात्री उशिरा झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धाराशिव पालिकेसाठी केवळ ६ जागा देण्याच्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते व पदाधिकारी तीव्र नाराज होते. परिस्थितीची माहिती प्रदेशाध्यक्षांना देत अखेर बाहेर पडणे हाच मार्ग, असा निष्कर्ष काढण्यात आला. दरम्यान, धाराशिव नगराध्यक्षपदाचा उमेदवारही राष्ट्रवादीकडून निश्चित झाला असून, माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी हे पक्षाचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील.
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जागांवर अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र उमेदवारी दाखल करत असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे.
महाविकास आघाडीत फुट पडल्याने मतांचे विभाजन अटळ ठरणार असून, त्याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो, असा राजकीय वर्तुळातील अंदाज आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात घडलेल्या या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले आहे.
काँग्रेसला 9 जागा, तरीही समाधानी,
धाराशिव नगर पालिकेसाठी 41 पैकी 9 जागा मिळाल्याने काँग्रेस पक्षाने शिवसेना उबाठा गटासोबत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना उबाठा गटाचा असेल, हे आता निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडल्यानंतर काँग्रेस पक्षाला जागा वाढून मिळतील, अशीही शक्यता आहे.









