आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे तसा उमेदवारांचा उत्साह आणि राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्या चार दिवसांत केवळ 4 उमेदवारांचे 5 अर्ज दाखल झाले होते.
मात्र शुक्रवारी इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः धावपळ करत एकाच दिवशी तब्बल 23 अर्ज दाखल केले आणि त्यामुळे आतापर्यंतची एकत्रित अर्जसंख्या 28 वर पोहोचली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 27 अर्जांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णा खंडेराव चौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून नगरसेवक पदासाठी विविध पक्षांकडून आणि अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत.
त्यात काँग्रेसकडून 3, शिवसेना (उबाठा) कडून 5, भाजपकडून 5, आम आदमी पक्षाकडून 1 तर अपक्षांकडून 8 असे अर्ज सादर करण्यात आले आहेत.
निवडणूक लढविण्यास इच्छुकांची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज बेबाकी (नो ड्यूज) प्रमाणपत्रासाठी झालेल्या मोठ्या गर्दीतून दिसून येतो. आतापर्यंत 400 पेक्षा अधिक इच्छुकांनी बेबाकी प्रमाणपत्रे घेऊन आपली तयारी पूर्ण केली आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी आता शनिवार आणि सोमवार हे दोनच दिवस शिल्लक असल्याने पुढील दोन दिवसांत अजून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. धाराशिव नगरपालिकेतील 20 प्रभागांतून 41 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडायचा आहे.
यासाठी शहरातील 94 हजार मतदार मतदान करणार असून प्रभागरचना, वाढता कल, विविध पक्षांची हालचाल आणि उमेदवारीचा वाढता ओघ पाहता यंदाची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होईल अशी शक्यता आहे.









