पुजाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आरंभ मराठी / धाराशिव
ड्रग्जचा प्रसाद आणि गाभाऱ्याचे पवित्र्य नष्ट या आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या विधानांवर तुळजापुरात संतापाची लाट उसळली असून, आमदार सावंत यांच्यावर तात्काळ FIR दाखल करावा, अशी मागणी पुजारी वर्गाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
५ जानेवारी रोजी ढोकी येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी तुळजाभवानीच्या भक्तांना प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल आणि गाभाऱ्याला कशाला हात लावता ? पवित्र्य राहणार आहे का ?… पवित्र्य नष्ट करण्याचे पाप केले, अशी विधाने करत देवीचा अवमान केला आणि भक्तांच्या श्रद्धेवर घाला घालणारी आणि कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी वक्तव्ये केल्याचा गंभीर आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर भक्त, पुजारी आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे तात्काळ FIR नोंदवून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
प्रसाद म्हणून ड्रग्ज,असे विधान केवळ राजकीय भाष्य नसून देवतेच्या पवित्रतेवर जाणीवपूर्वक आघात करणारे, भक्तांच्या भावना दुखावणारे आणि अमली पदार्थांच्या बेकायदेशीर कृत्यांना अप्रत्यक्ष उत्तेजन देणारे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी हेच मंदिर संस्थानचे अध्यक्ष असल्याने, या विधानातून मंदिर किंवा प्रशासनामार्फत अमली पदार्थ देण्याचा अर्थ निघतो, जो देवीच्या पावित्र्याचा अवमान तर आहेच, शिवाय प्रशासनाच्या प्रतिमेवरही थेट आघात करणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे गाभाऱ्याला ठेच लागली…पवित्र्य नष्ट करण्याचे पाप केले, या विधानातून गाभाऱ्याच्या पवित्रतेवर सार्वजनिकरीत्या संशय निर्माण करण्यात आला, मंदिर व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष आरोप लावले गेले आणि श्रद्धास्थानाबाबत अवमानकारक संदेश पसरविला गेला, असा आक्षेप घेतला जात आहे. या विधानांमुळे भक्तांमध्ये संभ्रम, संताप आणि तणाव वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनानुसार या वक्तव्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे, वैर व द्वेष पसरविणे, सार्वजनिक उपद्रव, अफवा पसरविणे, मानहानी तसेच NDPS कायद्याअंतर्गत अमली पदार्थांना प्रवृत्त करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्स, माध्यम कात्रणे आणि सोशल मीडिया पोस्ट्स जप्त करून FIR दाखल करावा, डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक संरक्षण करावे, दोषींना सार्वजनिक माफी किंवा स्पष्टिकरणास भाग पाडावे, तसेच मंदिर संस्थानकडून अधिकृत खंडन जारी करून चुकीचा संदेश दुरुस्त करावा, अशा मागण्या पुढे आल्या आहेत. भविष्यात मंदिर, देवी व संस्थांबाबत अपमानास्पद संदर्भ टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढावेत आणि गुन्हेगारी बातम्यांत मंदिर किंवा महाद्वाराचे फोटो वापरण्यास बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, संदीप केवडकर, महेश खंदारे, अमर हंगरगेकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.








