आरंभ मराठी / धाराशिव
सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालये व पाणपोईतील वाढत चाललेली अस्वच्छता आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांतील गंभीर त्रुटी यावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (दि.28) अचानक सोलापूर बसस्थानकाची पाहणी करून अस्वच्छतेबाबत जबाबदार धरत सोलापूर आगार व्यवस्थापकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी दुपारी केलेल्या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांना शौचालय परिसरात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली.
अनेक ठिकाणी उखडलेल्या फरशा, दुर्गंधीयुक्त परिसर, स्वच्छतेची पूर्णपणे घसरलेली अवस्था त्याचप्रमाणे पाणपोईचा भागही अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे समोर आले. पाणपोईवरील पाच नळांपैकी फक्त एकच नळ सुरू होता, तर उर्वरित नळ बंद होते. या स्थितीबाबत केलेल्या चौकशीत आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक समाधानकारक स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरले.
विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातच सरनाईक यांनी धाराशिव आणि सोलापूर बस स्थानकाला अचानक भेट देऊन या सर्व त्रुटी तत्काळ दूर करण्याचे आदेश दिले होते. प्रवाशांच्या सुविधा हे महामंडळाचे प्राधान्य असल्याने सुधारणा न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा करण्यात आली नसल्याने शुक्रवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले.
सोलापूरच्या घटनेनंतर मंत्री सरनाईक यांनी राज्यातील सर्व २५१ आगार प्रमुखांना स्पष्ट इशारा दिला की,
प्रवासी सुविधांबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही
विशेषतः महिला प्रसाधनगृह आणि स्वच्छता व्यवस्थापनात कसूर केल्यास थेट निलंबनास सामोरे जावे लागेल. एसटी ही जनसामान्यांची वाहतूक व्यवस्था असल्याने स्वच्छ शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि नीटनेटकेपणा या मुलभूत सुविधा प्रवाशांना मिळणे अत्यावश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सतत देखरेख ठेवून वेळोवेळी कडक पावले उचलली जातील, असा ठाम संदेश सरनाईक यांनी दिला.
धाराशिवच्या अधिकाऱ्यांची भंबेरी –
सोलापूर आगार व्यवस्थापकावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईने राज्यभरातील परिवहन विभागात खळबळ उडाली असून त्याचा थेट परिणाम धाराशिव बस स्थानकातही पाहायला मिळत आहे. सोलापूर येथील कारवाईची माहिती मिळताच धाराशिव येथील बस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी एका प्रकारे ‘खडबडून जागे’ झाले आहेत.
धाराशिव बस स्थानक परिसरात सध्या स्वच्छतेची तातडीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. दिवसभराच्या सेवेनंतर कर्मचारी घरी न जाता, रात्री उशिरापर्यंत बस स्थानकातच थांबून साफसफाई करत असल्याचे चित्र दिसत आहे. उद्या पालकमंत्री सरनाईक हे धाराशिव बस स्थानकाला भेट देणारा असून अस्वच्छता आणि गैरसोयीबद्दल आपल्यावर कारवाई करू नये यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचारी खडबडून जागे झाले आहेत.
अचानक सुरू झालेली ही धावपळ पाहून प्रवाश्यांमध्येही चर्चा रंगल्या आहेत. स्वच्छतेची ही मोहीम केवळ पाहणीची भीती म्हणून नव्हे, तर नियमितपणे राबवली जावी, अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.









