पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जोडले हात, वाद थांबवण्याची विनंती
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील एकमेकांवर तुटून पडले. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. अपेक्षेप्रमाणे ही बैठक अतिशय वादळी ठरली. खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील हे दोघेही कामांना दिलेल्या स्थगितीच्या कारणावरून ते ड्रग्ज प्रकरणावरून हमरीतुमरीवर आल्याचे दिसले. बैठक सुरू होताच खासदार ओमराजे यांनी पालकमंत्री यांना कामांना स्थगिती कोणी दिली आणि का दिली तसेच यामागचा झारीतील शुक्राचार्य नेमका कोण आहे याचे उत्तर द्या. असा सवाल केला. पालकमंत्री यांना अंधारात ठेवून जिल्ह्यात कोणती ताकत आहे जी कामांना स्थगिती देते असा सवाल केला.
पालकमंत्री यांनी काही उत्तर देण्यापूर्वीच आमदार राणा पाटील यांनी, कामांना देण्यात आलेली स्थगिती ही मुख्यमंत्री पातळीवर देण्यात आलेली असून, ज्याला उत्तर हवे आहे त्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून स्थगितीचे कारण जाणून घ्यावे असा टोला हाणला. तसेच आर्थिक वर्ष 31 मार्चला संपले असताना ही कामे वर्षभर का झाली नाहीत असाही सवाल आमदार राणा पाटील यांनी यावेळी केला.
ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामांवर बरेच आक्षेप घेण्यात आलेले असून, चुकीच्या पद्धतीने ही कामे केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, वेळ आल्यावर त्या सर्व कामांचा खुलासा केला जाईल असा इशारा आमदार राणा पाटील यांनी नाव न घेता ओमराजे यांना दिला.
यावेळी आमदार राणा पाटील यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा विषय काढून तुळजापूर शहराला जाणूनबुजून बदनाम केले जात असल्याचा आरोप केला. हे प्रकरण मी स्वतः समोर आणले असून, पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणाची माहिती सुरुवातीला मीच दिली होती, त्यामुळे ड्रग्ज प्रकरण उजेडात आले असल्याचा दावा आमदार राणा पाटील यांनी केला. यावर खासदार ओमराजे यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी जाहीर पत्रकार परिषद घेऊन माझा बाप काढतात आणि पातळी सोडून बोलतात अशी तक्रार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
या प्रकरणी 22 आरोपी आणखी का फरार आहेत ते पोलीस अधीक्षक यांना विचारा, तपास योग्य दिशेने का सुरू नाही, असा सवाल ओमराजे यांनी केला. तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून यातील आरोपी असणाऱ्यांना फासावर लटकवा अशी मागणी केली. यावेळी ओमराजे आणि राणा पाटील यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. दोघांनाही थांबवण्याचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खूपदा प्रयत्न केला परंतु, दोघांनीही माईक बंद न करता बोलणे सुरूच ठेवल्यामुळे पालकमंत्री वैतागल्याचे चित्र दिसत होते.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व सभागृह यावेळी काहीवेळा स्तब्ध झाले होते. शेवटी पालकमंत्री सरनाईक यांनी सगळ्यांनी माईक बंद करा आता मी एकटा बोलणार म्हणत, बोलणे सुरू केले. कामावर स्थगिती का आली याचे उत्तर थेट देण्याचे पालकमंत्री यांनी टाळले. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्याचा निधी लॅप्स होणार नाही असा शब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना नेस्तनाबूत करण्यासाठी जे करायचे ते केले जाईल आणि ड्रग्ज प्रकरण संपवले जाईल असे सांगितले. तसेच या प्रकरणाच्या पोलीस तपासात राजकारण येणार नाही याची काळजी घेतली जाईल असा शब्द दिला. जिल्हा नियोजनाची बैठक जिल्ह्याच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठी असते, अशा बैठकीत दुसरे विषय घेऊन बैठकीला वादग्रस्त करू नका, माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की, राजकारण सोडून एकत्र येऊन विकास करूया. मी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली ती केवळ पक्षविरहित विकास करण्यासाठी त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारीने वागावे अशी सूचना केली. पालकमंत्री यांनी विनंती केल्यानंतर बैठक शांततेत पार पडली.