आरंभ मराठी / धाराशिव
विभागीय महसूल व क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात धाराशिव संघाने नांदेड संघावर ११ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे संघाचे नेतृत्व स्वतः जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी करत संघाला प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना धाराशिव संघाने निर्धारित १२ षटकांत ५ बाद १४५ धावांचा भक्कम डोंगर उभारला. संघाच्या डावात रणधीर भोसले यांनी आक्रमक फलंदाजी करत ३६ चेंडूत ६३ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यांना रणदीप सूर्यवंशी यांनीही चांगली साथ देत १९ चेंडूत ४४ धावा करत संघाची धावसंख्या उंचावली.
१४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नांदेड संघाला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. धाराशिवच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले. नांदेड संघ निर्धारित १२ षटकांत ८ गडी गमावत केवळ १३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
धाराशिवच्या गोलंदाजीत अनिकेत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ३ षटकांत केवळ १६ धावा देत ३ बळी घेतले. तर कर्णधार कीर्ती किरण पुजार यांनीही प्रभावी गोलंदाजी करत २ षटकांत १३ धावा देत एक गडी बाद केला. अंतिम सामना जिंकताच धाराशिव संघाने मैदानावर जल्लोष साजरा केला. संघाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.









