कुटुंबावर दुःखाचा डोंगर, आरोपींवर कारवाईची मागणी
आरंभ मराठी / पाथरूड
विवाहित मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण करून जंगलात फेकून दिल्याची घटना 14 दिवसांपूर्वी घडली होती. गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला असून, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण ?
भूम तालुक्यातील येथील दुधोडी येथील 18 वर्षे तरुण माऊली बाबासाहेब गिरी याचे पांढरेवाडी येथील एका विवाहित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सदरील मुलगी वडाचीवाडी येथे मामाकडे शिक्षणासाठी असल्यामुळे शाळेमध्ये असताना दोघांचे प्रेम प्रकरण जुळून आले होते. सदरील मुलीचे लग्न झाल्यानंतरही दोघांमध्ये प्रेम संबंध चालू होते. 3 मार्च रोजी व्हाट्सअपवरून दोघांमध्ये भेटण्याच्या संदर्भात संवाद झाला. मुलीच्या पतीने हा संवाद वाचला.त्याने मोबाईल ताब्यामध्ये घेऊन माऊली गिरी यास भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. आल्यानंतर माऊलीस घरामध्ये कोंडून मुलीचे पती, वडील व अन्य चार ते पाच जणांनी विवस्त्र करून माऊली गिरी यास लोखंडी रोड, काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर विवस्त्र अवस्थेत पांढरेवाडी येथील रस्त्यालगत फेकून दिले. केळेवाडीचे पोलीस पाटील यांनी माऊली गिरी याचे वडील बाबासाहेब गिरी यांना सदर घटनेची माहिती सांगितल्यानंतर गंभीर अवस्थेत माऊली याला जामखेड येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र, प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. 14 दिवसाच्या उपचारानंतरही किडनीवर व अन्य ठिकाणी जास्त मार लागल्यामुळे अखेर माऊली गिरी याने रविवारी सकाळी साडेदहा अखेरचा श्वास घेतला.
गावकऱ्यांनी वर्गणी करून केले होते उपचार
बाबासाहेब महादेव गिरी यांच्या तक्रारीनंतर सतीश जगताप व चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.आर. खरड करीत आहेत. झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीच बाबासाहेब गिरी यांच्या मोठ्या मुलाने आत्महत्या केली होती. बाबासाहेब गिरी यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून, दुधडी गावकऱ्यांनी वर्गणी करून माऊली गिरी याच्या उपचारासाठी पैसे पाठवले होते. सदरील घटनेचा तपास करून सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे