आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत छत्रपती संभाजी नगर विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्य पातळीवर पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी धाराशिव जिल्ह्याने २०० पैकी १८५.२५ गुण मिळवत ही कौतुकास्पद कामगिरी साध्य केली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा १५० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्ह्याचा लौकिक वाढला आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह संपूर्ण प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा सत्कार करून जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष प्रशंसा केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली ई-गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीत सातत्य, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी समन्वय साधण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य पातळीवरील क्रमवारीनुसार जळगाव जिल्ह्याने १८८ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर १८६.७५ गुण मिळवून ठाणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. १८५.२५ गुणांसह धाराशिव जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला. त्याखालोखाल १७९.२५ गुणांसह लातूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर, तर १७७ गुण मिळवून कोल्हापूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर राहिला.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मागील काळात धाराशिव जिल्ह्यात प्रशासनिक सुधारणा, डिजिटल सेवा, नागरिकाभिमुख उपक्रम आणि वेळबद्ध कामकाज यावर भर देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळेच ‘सर्वोत्तम जिल्हाधिकारी’ म्हणून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. दरम्यान, हा १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्येही राबविण्यात आला असून त्याचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमात प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य पातळीवर बाजी मारल्यानंतर आता जिल्हा परिषदही उत्कृष्ट क्रमांक पटकावेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
एकूणच ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील या यशामुळे धाराशिव जिल्ह्याची राज्यभरात सकारात्मक ओळख निर्माण झाली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.








